कोल्हापूर : बांधकाम विभागाकडे काम करणाऱ्या ठेकेदारांची २७ हजार कोटी रुपयांची देणे थकीत आहेत. ती तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी करीत ठेकेदारांनी वाहने बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसवली. कामाची बिले मिळत नाहीत तोपर्यंत काम आहे त्या स्थितीत ठेवण्याचा इशारा यावेळी ठेकेदारांनी दिला.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम करणाऱ्या ठेकेदारांची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. गेली सात महिने एक रुपयाही ठेकेदारांना दिलेला नाही. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले आहेत .
ठेकेदारांची ७० टक्के रक्कम तातडीने देण्यात यावी, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी तर पुढील आर्थिक वर्षासाठी ३० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. डंपर, जेसीबी, रोड रोलर आदी वाहने घेऊन ठेकेदार थेट बांधकाम कार्यालयात घुसले. बिल तत्काळ मिळावीत यासाठी ठेकेदार आक्रमक झाले होते. टाळ वाजवत आणि भजन करत या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.