कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या विविध भागावर तडे गेले आहेत. या भागाचे तातडीने संवर्धन गरजेचे आहे, असा निष्कर्ष पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात नोंदवण्यात आला आहे. अंबाबाई महालक्ष्मी मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्यासमोर सुरू आहे. वादी गजानन मुनीश्वर व इतरांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी करण्याची मागणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार १४ व १५ मार्च रोजी करवीर निवासिनीच्या मूर्तीची पाहणी पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी केली. या पाहणीचा ८ पानी अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर झाला. या सुनावणी प्रसंगी ॲड. नरेंद्र गांधी, ॲड. ओंकार गांधी, वादी गजानन मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई. ॲड. प्रसन्न मालेकर उपस्थित होते.
हेही वाचा : साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली
झीज कोठे ?
अंबाबाई महालक्ष्मी मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली आहे. ती झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. देवीचे नाक, ओठ, हनुवटी यावर तडे गेले असून ते रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्याचे आहेत. त्यामुळे चेहरा, किरीट या भागाचे संवर्धन तातडीने गरजेचे असल्याचे अहवालात नोंदवले आहे.
काय करायला हवे ?
संवर्धन प्रक्रियेत वापरलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्यास तडे जाऊन थर निघत आहेत. अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे असल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. यावर उपाय म्हणून मूर्ती भक्कम करण्याकरता ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून ते मुजवता येतील. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील.
हेही वाचा : कोल्हापुरात सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
दक्षता कोणती ?
रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल. वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून काळजी घेणे. मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे. पुष्पहार न घालता उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणे. गर्भगृहातील संगमरवर काढणे. कीटकांचा उपद्रव होऊ नये याकरता उपाययोजना करणे. आर्द्रता, तापमान यांचे नियंत्रण करणे. अलंकार, किरीट घालताना काळजी घेणे, अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत.