कोल्हापूर : पावसाची संततधार कायम असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढून श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून श्रींच्या मुखचरणकमलाला स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडते याला दक्षिणद्वार असे संबोधतात. त्यामुळे भाविकांनी पहाटेच दर्शनासाठी गर्दी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विशाळगडची घटना जिल्हा प्रशासन, पोलिसांचे अपयश – शाहू छत्रपती यांचा आरोप

उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. यामुळे चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व ‘श्री गुरुदेव दत्त’च्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा भाविकांनी लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाल्याने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणांहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान, श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प. पू श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूलही पाण्याखाली गेला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur dakshindwar sohla nrusinhwadi css