कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काजूचे उत्पादन विपुल प्रमाणात होते. त्यापासून मूल्यवर्धित उत्पादने घेण्याची गरज आहे. काजू पीकापासून मद्यनिर्मिती तसेच काजू बी परतावा याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. चंदगड येथे नगरपंचायतीच्या कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत भूमिपूजन व कोनशिला अनावरण, शिवसृष्टीचे लोकार्पण, प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी व कोनशिला अनावरण, चंदगड नगरपंचायतीच्यावतीने नागरी सत्कार समारंभ व जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काजू पीकाच्या विकासासाठी राज्य शासनाने १ हजार ३२५ कोटींची तरतूद केली आहे. या निधीमधून काजू पीकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे. चंदगड मतदार संघातील कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल.
हेही वाचा : कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या
पाण्याचे नियोजन
चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येत आहे. तालुक्यात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
हेही वाचा : शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेवरून कोल्हापुरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये संयोजक – पालकांमध्ये वाद
राजेश पर्व
आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की, चंदगड मतदारसंघात आतापर्यंत ८५० कोटींची कामे झाल्याने विकासाचे राजेश पर्व सुरु झाले आहे. चंदगड येथे ट्रामा केअर युनीट व उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषीमंत्री धनजंय मुंडे, चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.