कोल्हापूर : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणाने पुन्हा उचल घेतली आहे. या भ्रष्टाचाराची त्वरित ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी, सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे तसेच अन्य मागण्यांसाठी ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था’, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा मोर्चा सकाळी ११ वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होऊन व्हिनस चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. मोर्चाच्या अंती मान्यवरांचे मार्गदर्शन होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी शुक्रवारी दिली आहे. “या देवस्थानमध्ये प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्‍वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी, मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. भक्तांची मागणी असूनही सी.आय.डी. चौकशी होण्यामागे दिरंगाई का ?” असा प्रश्न घनवट यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “लोकसभेसाठी दोन, तर विधानसभेसाठी १५ जागा मिळाव्यात”, जोगेंद्र कवाडे यांची महायुतीकडे मागणी

मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका

या मोर्चाच्या नियोजनासाठी, तसेच पाठिंब्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका होत आहेत. कोल्हापूर येथील शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे झालेल्या बैठकीत सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी मोर्चाला पाठिंबा देत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष आनंदराव पवळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उदय भोसले, उद्धव ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शशी बिडकर, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब बन्ननेवार, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमोद सावंत, धर्मप्रेमी रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, प्रतिभा तावरे उपस्थित होत्या.

हेही वाचा : मराठी चित्रपट महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश; मेघराज राजेभोसले यांना विरोधकांचा धक्का

एक दिवस बाळूमामांसाठी

या मोर्चाच्या प्रसारासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी संत बाळूमामा यांचे भक्त, विविध देवस्थानांचे प्रमुख-विश्‍वस्त, विविध मंडळ यांच्या बैठका चालू आहेत. सर्वांनी  ‘एक दिवस बाळूमामांसाठी’ असा निर्धार व्यक्त करून कोणत्याही परिस्थितीत बाळूमामा देवस्थान हे भक्तांच्या ताब्यातच राहिले पाहिजे, यासाठी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. या संदर्भात फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप अशा सामाजिक माध्यमांद्वारेही मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur demand of cid investigation of balumama devasthan temple financial frauds css
Show comments