कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सतेज पाटील हे राज्यमंत्री होते. हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री होते. तरीही मुश्रीफ यांच्या तोंडचा घास हिसकावून सतेज पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री झाले, अशी टीका भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल येथे सभा झाली. यावेळी बोलत असताना महाडिक यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील आणि भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमकी सुरू असतात. सतेज पाटील हे कोल्हापूरचे दोन वेळा पालकमंत्री झाले आहेत. तर गेल्या वेळचे पालकमंत्री पद कसे घडले यावरून धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.

हेही वाचा : कोल्हापुरातील समाज धुरीण एकवटले; फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय नैतिकता गमावल्याची चिंता

महाडिक म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री होते. तर दीड वेळा निवडून आलेले सतेज पाटील हे राज्यमंत्री होते. यामुळे राज्यातील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ होता. त्यांचा सत्तेत तितकाच वाटा होता. परंतु कोल्हापूरला पालकमंत्री देत असताना हसन मुश्रीफ यांच्यावर अन्याय झाला. त्यांना अहमदनगरचे पालकमंत्री करण्यात आले. म्हणजे जायला आठ तास आणि यायला दहा तास अशी अवस्था होती.

हेही वाचा : त्याचे ठुमके आणि राजकीय डायलॉग बाजीने अभिनेता गोविंदाने इचलकरंजीकरांची मने जिंकली

परंतु राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांना पालकमंत्री करण्यात आले. यामागे काय घटना घडल्या हे मला चांगलेच माहिती आहे. परंतु कॅबिनेट मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या तोंडचा घास हिसकावून सतेज पाटील हे मंत्री झाले, अशी टीका करत महाडिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना सभेत मांडली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur dhananjay mahadik criticizes satej patil for becoming guardian minister of kolhapur css