कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश अग्रेषित केला आहे. मात्र, कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे कसलेच वातावरण नसताना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्याच कशा ? या प्रश्नावरून कोल्हापूरकरांमध्ये आज रंगतदार चर्चा सुरू झाली. पण त्याचा उलगडा झाल्यानंतर जिल्ह्यातून हसन मुश्रीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जन्म रामनवमीचा! त्यामुळे ते प्रत्येक वर्षी रामनवमीच्या दिवशी वाढदिवस दणक्यात साजरा करत असतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच आठवडाभर कोल्हापुरात वाढदिवसाची धूम आणि वातावरण निर्मिती सुरू असते. पण आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या. त्याचा संदेश समाज माध्यमांवरून अग्रेषित करण्यात आला. मुश्रीफ यांचा वाढदिवस नसताना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्याच कशा, असाही प्रश्न अनेकांना पडला. तर काहींनी ही चुकीची पोस्ट असल्याचे सांगायला सुरू केली.

हेही वाचा : शक्तीपीठ महामार्ग विरोधात रणशिंग; कोल्हापुरात ४ एप्रिलला शेतकऱ्यांचा मेळावा

यानंतर तपशिलात गेल्यानंतर असे लक्षात आले की हसन मुश्रीफ यांची इंग्रजी दिनदर्शिकेनुसार जन्मतारीख ही २४ मार्च रोजीची आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या समाजमाध्यमांचे काम पाहणाऱ्या अधिकारी आणि विभागाने रीतसर हसन मुश्रीफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा देणारा संदेश अग्रेषित केला. ही बाब लक्षात आल्यानंतर मग कोल्हापूरकरांनीही आपापल्या परीने समाजमाध्यमांतून हसन मुश्रीफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. तसेच त्यांची जन्मतारीख २४ मार्च रोजीचीच कशी आहे, हे दाखवणारे तपशीलही शेअर करायला सुरुवात केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur discussion of social media post of cm eknath shinde wishing hasan mushrif on birthday css