कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यातील मतभेद ताणत असल्याचे शनिवारी पुन्हा एकदा जाहीरपणे दिसून आले. महापालिकेच्या आजच्या कार्यक्रमास आयुक्त अनुपस्थित राहिल्याने त्यावरून मुश्रीफ यांनी के. मंजूलक्ष्मी यांच्यावरील नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने त्याची चर्चा होत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या एका कार्यक्रमप्रसंगी डिसेंबर महिन्यात पालकमंत्री मुश्रीफ यांनी रस्ते कामातील टक्केवारीवरून आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. आपल्याला कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबलं आहे का? रस्ते करण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर होऊनही कामे का झाली नाहीत? आयुक्तांना आयुक्त राहण्यात रस आहे कि जिल्हाधिकारी होण्यात आहे हे मला माहीत नाही. रस्ते नीट नसल्याने नागरिक पालकमंत्र्यांवर टीका करत आहेत, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी महापालिकेत नव्याने दाखल झालेल्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना जाहीर कार्यक्रमात फटकारले होते. तेव्हापासून त्या मुश्रीफ यांच्याबाबतीत नाराज असल्याचे सांगितले जात होते.
हेही वाचा : “सतेज पाटील यांच्याकडे बालिशपणा कोठून येतो”, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल
पालकमंत्री – आयुक्तांचे बिनसले
आज महापालिकेच्या रेल्वे पूल पादचारी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे आयुक्तांनी पाठ फिरवल्याने पालकमंत्री मुश्रीफ यांचा तिळपापड झाला. हि सल मुश्रीफ यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला त्या येणार असे सांगण्यात आले होते. पण निवडणूक प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेल्याचे आता सांगण्यात आले. वास्तविक माझे सचिव हेही निवडणूक प्रशिक्षणासाठी जात असून त्यांनी पूर्वकल्पना दिली आहे. महापालिकेच्या कामाशी संबंधित लोकांना आज येथे यायला सांगितले आहे. आयुक्त नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. प्रशिक्षण सोमवारी असून नवी दिल्लीला जाण्यासाठी विमानांची संख्या पुरेशी असताना अचानक अनुपस्थित राहणे अयोग्य आहे, असे नमूद करीत मुश्रीफ यांनी आयुक्तांवर दुसऱ्यांदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यातून दोघांमध्ये तणाव वाढीस लागल्याचे दिसून आले.
हेही वाचा : वारणा धरणातून थेट पाइपलाइन हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी योग्य पर्याय – शाहीर विजय जगताप
कोल्हापूरच्या विकासाला गती
दरम्यान, या कार्यक्रमात बोलत असताना मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरच्या रस्ते कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केली आहे. महालक्ष्मी मंदिर विकासासाठी १० कोटी मंजूर झाले असून पुरवणी अर्थसंकल्पात ४० कोटी मंजूर झाले आहेत. शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी पादचारी उड्डाणपुलाची लांबी ५२ मीटर, रुंदी ३.७ मीटर असून तीन पिलरचे बांधकाम असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पाणीपुरवठा विभागाच्या अनुकंपा तत्त्वावरील पात्र कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. माजी नगरसेवक आदिल फरास, सत्यजित कदम, राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन विजय वणकुदे यांनी केले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, कनिष्ठ अभियंता अरुणकुमार गवळी, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, माजी नगरसेवक संजय मोहिते, नागरिक उपस्थित होते.