कोल्हापूर : पन्हाळा, रत्नागिरीकडे जाणारा कोल्हापूर शहरालगतचा शिवाजी पूल बंद करण्यात आल्यानंतर पाठोपाठ चार तालुके, कोकण, गोवा राज्याला जोडणाऱ्या बालिंगा पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय आज चांगलाच वादग्रस्त ठरला. हा पूल बंद झाल्याचे समाज माध्यमातून सांगितल्यावर त्याचा प्रशासनाने इन्कार केला पण याच प्रशासनाने संध्याकाळी पुल बंद करण्यात आल्याची जाहीर केले. मात्र त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बालिंगा पूल कोल्हापूर पासून जवळच आहे या मार्गावरून पुढे बाजारपेठेचे कळे तालुक्याचे गगनबावडा तर त्याहून पुढे कोकण आणि गोवा हा मार्ग जोडला जातो जिल्ह्याच्या पश्चिमेकडील चार तालुक्याची वाहतूक , धनंजय पवार यावर अवलंबून आहे. मात्र तो बंद होणार असल्याने या भागातील नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच सकाळपासूनच हा पूल बंद केल्या जाणार असल्याचे संदेश समाज माध्यमात येऊ लागले. त्यावर प्रशासनाने हि अफवा असल्याचे स्पष्ट केले. पण सायंकाळी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद केल्याचे जाहीर केल्यावर या भागातील नागरिकांनी नाराजी दर्शवली.
हेही वाचा : अलमट्टीतून ३ लाख क्युसेक विसर्ग – हसन मुश्रीफ; पूरग्रस्तांना दिलासा मिळणार
मागील महापुरावेळी झालेल्या संघर्षाची माहिती देऊन करवीर समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन दूध, भाजीपाला, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक कामासाठी वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी केल्यावर ती मान्य करण्यात आली. मात्र बालिंगा पुल सुरू की बंद यावर प्रशासनाने केलेला सावळा गोंधळ पाहता नागरिकांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या.