कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. कोल्हापूर शहरासह परिसरात पहिलाच मुसळधार पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यामध्ये छोटे तलाव अर्ध्या तासातच भरून वाहू लागले. गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तापलेला पारा खाली आला होता. तीन-चार दिवसाच्या अंतराने पावसाचे दर्शन होत होते. जून महिना सुरु झाल्यानंतर मान्सूनचे आगमन कसे होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा वळल्या होत्या. शेतीच्या कामांना गती आली होती.
हेही वाचा : संजय मंडलिक यांच्या पराभवाचे चिंतन; महायुतीच्या नेत्यांची बैठक
आज सकाळपासून उष्मा जाणवत होता. दुपारनंतर कोल्हापूर परिसरात पावसाला सुरुवात झाली. करवीर, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यामध्ये पाऊस झाला. हातकणंगले तालुक्याच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस झाला. वाठार, घुणकी, तांदूळवाडी ,कोरेगाव, किनी, पेठ वडगाव या भागात दोन तासाहून अधिक काळ पावसाने झोडपून काढले. काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या परिसरातील छोटे तलाव अर्ध्या तासातच भरून ओसंडून वाहू लागले. पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.