कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभर परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे भात पिकाची कापणी आणि झोडपणीची कामे खोळंबली आहेत. भात पिकाची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भाजीपाला, ऊस पिकांचे नुकसान झाले.

सततच्या पावसामुळे ऊस पिकाची पुरेशी वाढ झाली नाही. खरिपातील भात, नाचणी, भुईमूग, वरी आदी पिकांसाठी पोषक असा पाऊस झाल्याने ही पिके समाधानकारक आहेत. मात्र भुईमूग पिकावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे.

हेही वाचा: भविष्य निर्वाह निधी विभागाची शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस, भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ

शेतकऱ्यांची दिवाळी कडू

सध्या भात कापणीयोग्य झाले आहे. परिपक्व झालेल्या भात पिकाच्या कापणी आणि झोडपणीच्या कामाला शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने सुरुवात केली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे ही कामे ठप्प झाली आहेत. कापणी केलेल्या भात पिकाची पिंजार शेतात कुजून जात आहे. जोरदार पावसामुळे काढणीयोग्य भात, सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.