कोल्हापूर : जून उजाडला तरी कोल्हापूर महापालिकेचे नाले सफाईचे काम अजूनही कासवगतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले असतानाही कोल्हापूर महापालिकेला या कामाचे गांभीर्य नसल्याचे शुक्रवारी दिसून आले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने नाले सफाईचे काम एप्रिल महिन्यापासून हाती घेतली आहे. मात्र या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. आज  नालेसफाईचे काम ९० टक्के पूर्ण झाले होते. आजअखेर ८०८७ टन गाळ उठाव करण्यात आला आहे. तर नाल्यातून फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व तत्सम १५० टन मटेरियल बाहेर काढण्यात आले आहे. याचबरोबर छोटे नाले सफाईसाठी ४५ कर्मचा-यांची २ पथके तयार करण्यात आलेली असून शहरातील मुख्य नाल्याचे पोकलॅण्ड मशीनद्वारे आजअखेर १६३६ आयवा गाळ उठाव करण्यात आला.

हेही वाचा : कोल्हापुरात लाच प्रकरणी मंडल अधिकारी, खासगी व्यक्तीवर कारवाई

हे काम पोकलँड मशिन,जे.सी.बी., हायवा डंपरद्वारे करण्यात आले आहे. या पोकलँड मशिनद्वारे गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते महालक्ष्मीनगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल व वाय.पी. पोवार नगर ते हुतात्मा पार्क गार्डन ते ॲस्टर आधार हॉस्पीटल ते राजेंद्रनगर, श्याम सोसायटी नाला व हॉकी स्टेडियम ते रेणूका मंदीर या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता पुर्ण झालेली आहे. तर निकम पार्क ते मोरे मानेनगर, हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर पूल याठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु आहे.

महापालिकेच्यावतीने आज अखेर मनुष्यबळाद्वारे ४७६ चॅनेल्सची सफाई पुर्ण झालेली आहे.  तर जे.सी.बी मशिनद्वारे २०६  चॅनेल्स सफाई पुर्ण झाले आहे. तसेच मनुष्यबळाद्वारे शहरामधील मुख्य ड्रेनेज लाईन (मॅनहोल) २००० ड्रेनेज लाईनचे सफाईचे काम पुर्ण झाले आहे. सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य निरीक्षक जयवंत पवार, कीटकनाशक अधिकारी स्वप्निल उलपे यांनी या कामाची आज पाहणी केली.  

हेही वाचा : कोल्हापुरातील पासिंग दंडावरील कारवाई थांबवा; परिवहन अधिकाऱ्यांकडे ‘आप’ची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना तरीही…

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा बैठक १५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.  तेव्हा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावेत, अशा सूचना केल्या होत्या. या बैठकीस महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र नालेसफाईच्या कामाचा आजपर्यंतचा आढावा घेता हे काम अजूनही कूर्मगतीने सुरू आहे. जून महिना उजाडत आला तरी नालेसफाईचे काम गाळातच अडकले आहे. अजूनही १० टक्के काम अपुरे असल्याचे महापालिकेची आकडेवारी दर्शवत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur drain cleaning works are still incomplete ahead of monsoon css