कोल्हापूर : कोबीच्या दरात घसरण होऊ लागल्याने गडहिंग्लज तालुक्यातील एका शेतकऱ्याने एक एकरातील कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. उत्पादन खर्च इतकाही दर मिळत नसल्याने शेतकरी हिरवेगार पीक जमीनदोस्त करीत असल्याचे आणखी एकदा दिसून आले आहे.
खनदाळ (तालुका गडहिंग्लज) येथील कुमार पाटील या शेतकऱ्याने १६ हजार ५०० रुपयांना कोबीची रोपे खरेदी केली होती. त्याची ऑक्टोबर महिन्यात लावण केली होती. लक्षपूर्वक मशागत केल्याने पीक चांगले उगवले. ८० दिवसांत सुमारे ४० हजार रुपये खर्च त्यांनी केला होता.
हेही वाचा : कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – राजेश क्षीरसागर
पीक हाताशी आले आणि कोबीचा दर बाजारात घसरू लागला. इतर भागात कोबीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. त्याची बाजारात आवक वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कोबीच्या दरात जोरदार घसरण झाली आहे. उत्पादन खर्चा इतकाही दर मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. याच मनस्थितीत पाटील यांनी कोबीच्या एक एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.