कोल्हापूर : गोकुळने सीमाभागातील कमी केलेले दूध खरेदी दर पूर्ववत करावेत, अशी मागणी बेळगावातील दूध उत्पादक शेतकरी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. गोकुळने सीमाभागातील दूध दर कमी केले असल्याने त्यावर सीमाभागात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतेच गोकुळच्या अधिकाऱ्यांना चिलिंग सेंटर मध्ये कोंडून ठेवण्याचा प्रकार गळतगा या सीमाभागातील गावात घडला होता.
बेळगाव निपाणी भागातील बहुतांश दूध उत्पादक शेतकरी गोकुळला (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) दूध पुरवठा करतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सीमाभागातील म्हशीच्या व गाईच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. आधीच पशुखाद्य व वैरणीचे दर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमाभागातील दूध दर कमी करणे हा सीमाभागातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या निर्णयामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
हेही वाचा : माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
मंत्र्यांना साकडे
महाराष्ट्र शासन जसे नेहमी सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रीयन समजते तशीच वागणूक देऊन कोल्हापूरप्रमाणेच सीमाभागातील शेतकऱ्यांना सुद्धा खरेदी दर द्यावा, अशी मागणी सीमाभागातील शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने कृषी मंत्री धनंजय मुंडे, गोकुळचे नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे नेते व आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडे केली आहे.