कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !

इचलकरंजी व चंदगडमध्ये दोन्हीकडे तर कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखणे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान असणार आहे.

kolhapur, maha vikas aghadi, mahayuti,
कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे ! ( छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याच्या प्रक्रियेने गती घेतली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडाचे झेंडे रोवले जात आहेत. इचलकरंजी व चंदगडमध्ये दोन्हीकडे तर कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले येथे एका पक्षात बंडखोरी निश्चित असून ती रोखणे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान असणार आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत कोल्हापूर दक्षिणमध्ये माजी आमदार अमल महाडिक तर इचलकरंजीत राहुल आवाडे यांचा समावेश आहे. आवाडे यांना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून भाजपमधील एक गट नाराज होता. याची चुणूक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दिसली. त्यांची पाठ वळताच माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आवाडे यांच्या उमेदवारीला विरोध करीत अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने भाजपमधील पहिली बंडखोरी पुढे आली. शुक्रवारी भाजप कार्यालयात आवाडे पिता पुत्रांच्या प्रवेशावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शेळके यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आवाडे यांच्या उमेदवारीबाबत एक वर्ग पडद्याआडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने वा राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना पाठबळ देण्याची शक्यता आहे. एकूणच नाराज ‘विठ्ठलाचा झेंडा’ हाती घेतील अशा हालचाली आहेत. याच मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादीकडून मदन कारंडे तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी उमेदवारीचा प्रबळ दावा केला असताना संजय तेलनाडे यांची बंडखोरी अटळ मानली जात आहे.

हे ही वाचा… शक्तिपीठ महामार्ग रद्द; हसन मुश्रीफ यांची घोषणा

चंदगडमध्ये सत्तारूढ आणि विरोधकांत बंडाचे वारे जोमाने वाहत आहे. अजित पवार यांनी आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गतवेळचे बंडखोर शिवाजी पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने महायुतीत ठिणगी पडली आहे. येथे शिवाजी पाटील यांची बंडखोरी अटळ आहे. दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळकर यांना विरोध करीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते एकवटलेले आहेत. बंडखोरांपैकी एकास उभे करून सांगली पॅटर्न राबवण्याची खलबते सुरू आहेत.

हे ही वाचा… Maharashtra News Live : लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपा विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणार? बाळा नांदगावकर म्हणाले….

कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसला उमेदवारी देण्याला शिवसेना – राष्ट्रवादीने विरोध केल्याने मविआ अंतर्गत वारे तापले आहे. याची परिणीती बंडखोरीत होण्याची शक्यता वाढली आहे. करवीर मध्ये एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार चंद्रजीत नरके आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी येथे संताजी घोरपडे यांच्यात कमालीची चुरस असून, याचे पर्यवसन बंडखोरीत होणार, असे दिसत आहे. हातकणंगले राखीवमध्ये आमदार राजू आवळे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असताना उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सवतासुभा मांडण्याचे डावपेच सुरू केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील निम्म्या मतदारसंघात बंडखोरीचे झेंडे रोवले जात असून, हे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kolhapur flag of rebellion in the mahayuti and maha vikas aghadi asj

First published on: 23-10-2024 at 21:03 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
Show comments