कोल्हापूर : हत्तीला हूसकावून लावण्यासाठी गेलेला वन कर्मचारी हत्तीने केलेल्या प्रतिहल्ल्यात ठार झाला. प्रकाश गोविंद पाटील (वय ५४) असे त्याचे नाव आहे. घाटकरवाडी येथील जंगलामध्ये शनिवारी सदर घटना घडली. या घटनेमुळे वन विभागासह आजरा तालुकावासीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती बाधित क्षेत्र असलेल्या घाटकरवाडी परिसरात गेले आठ दिवस हत्तीने धुमाकूळ घातला आहे.
हेही वाचा : कोल्हापुरात दुधाच्या मापात ५०० कोटींची लूट; शासनाकडून त्रिसदस्यीय समिती नियुक्त
उपद्रव करणाऱ्या या हत्तीला हूसकावण्याची मोहीम आज वनविभाग व ग्रामस्थांनी राबवली होती. याचवेळी हत्तीने हुसकावण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला केला. त्यात वनकर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (मूळ रा. गवसे) हे ठार झाले. गेली दहा वर्षे हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असतानाच आज वन विभागाच्या कर्मचाऱ्यालाच मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता तरी हत्तींचा बंदोबस्त होणार का ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.