कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात गांज्याचे पेव फुटल्यावरून पोलीस यंत्रणेला लक्ष्य केल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी गांजा सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्याची धिंड काढली.
पोलिसांनी गांजा सेवन करताना शुभम शेलार याला ताब्यात घेतले. त्याने किरण अवघडे याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अवघडे याच्या मातंग वसाहतीमधील घरी छापा टाकत ५५ हजार रुपये किंमतीच्या २ किलो गांजा ताब्यात घेतला. पोलिसांनी अवघडे व शेलार याची मातंग वसाहत परिसरातून धिंड काढली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहायक फौजदार समीर शेख आदींनी कारवाईत भाग घेतला.