कोल्हापूर : थायलंडचे आर्थिक सल्लागार, ‘गोकुळ’चे संचालक व यूथ बँकेचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांनी आज श्रीमंत शाहू महाराज यांना पाठिंबा दिला. त्यांनी लगेच प्रचाराला सुरुवातही केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी चेतन नरके यांनी केली होती . त्यासाठी ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते. काँग्रेस , राष्ट्रवादी , ठाकरे सेना यापैकी ज्यांच्याकडे मतदारसंघ जाईल, त्यांच्याकडून उमेदवारी घेण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथापि महाविकास आघाडी अंतर्गत हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे गेला. काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या आठवड्यामध्ये चेतन नरके यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तथापि पाठिंबा कोणाला याचा निर्णय मात्र त्यांनी राखून ठेवला होता. आज त्यांनी आपले पत्ते खोलले आणि काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला. त्यासाठी त्यांनी आज मेळाव्याचे आयोजनही केले होते.

हेही वाचा : कोल्हापुरातील समाज धुरीण एकवटले; फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय नैतिकता गमावल्याची चिंता

मी जरी जग फिरलो असलो तरी डॉ. चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन असून तेच घेऊन मी कोल्हापूरचा विकास करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मेळाव्यात बोलताना दिली. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके होते.

शाहू छत्रपती म्हणाले, डॉ. चेतन नरके यांनी आपल्या वडीलांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांचे विचार एकच असून शेतकरी केंद्रबिंदू मानून आगामी काळात काम करणार आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, चेतन नरके यांनी परदेशातील नोकरी सोडून जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून झपाटल्यासारखे काम केले. आगामी काळात त्यांना अरुण नरके यांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रेदादा व अरुण नरके यांच्यापासून करवीर, पन्हाळ्यात सहकार रुजला आहे, भविष्यात सहकार व समाजकारणात आमदार पी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सतेज पाटील हा चेतन नरके यांच्या मागे हिमालयासारखा राहील.

हेही वाचा :हसन मुश्रीफ यांचा तोंडचा घास हिसकावून सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री झाले; धनंजय महाडिक यांची टीका

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींनी काय केले म्हणून विरोधी उमेदवार विचारणा करत आहे, पण त्यांच्या वडीलांनी हसन मुश्रीफ यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतो म्हणून जिल्ह्या्तील ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा पराक्रम केला. देशात आज विचित्र परिस्थिती निर्माण झाली असताना डॉ. चेतन नरके यांनी मनाचा मोठेपणा दाखवत शाहू छत्रपतींना पाठींबा दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या दोन उमेदवारांसाठी गल्लीबोळात फिरण्याची वेळ आली आहे.

मेळाव्याचे संयोजक डॉ. चेतन नरके म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, थांबावे लागले म्हणून नाराज न होता, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचार घेऊन पुढे जाणाऱ्या शाहू छत्रपतींना पाठींबा देण्याची भूमिका घेतली.व्यासपीठावरील उपस्थिती पाहता, भविष्यातील नवी समीकरणे काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे सूचक वक्तव्य करत चेतन नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींना मोठे मताधिक्य देऊन येथेच त्यांच्या विजयाची पायाभरणी केली जाईल.

हेही वाचा :त्याचे ठुमके आणि राजकीय डायलॉग बाजीने अभिनेता गोविंदाने इचलकरंजीकरांची मने जिंकली

स्वागत इचलकरंजीचे नगरसेवक संतोष शेळके यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला आमदार प्रा. जयंत आसगावकर, बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भुयेकर, माजी सभापती रंगराव मोळे, संभाजी पाटील-कुडित्रेकर, आपटीचे माजी सरपंच विश्वास पाटील, सत्यशील संदीप नरके आदी उपस्थित होते. आभार चंद्रकांत जाधव यांनी मानले.
चेतन कष्ट वाया जाऊ देणार नाही

डॉ. चेतन नरके यांनी गेली अडीच वर्षे कोल्हापूर मतदारसंघातून तयारी केली होती.गाव आणि वाड्यावस्त्यांवर जाऊन संपर्क मोहीम राबवली होती. त्यांनी उमेदवारीसाठीही प्रयत्न केले, पण कॉग्रेसच्या आग्रह शाहू छत्रपतींसाठी राहिल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठींबा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. त्याची अडीच वर्षाची मेहनत्, कष्ट हा सतेज पाटील वाया जाऊ देणार नाही, एवढी ग्वाही या मेळाव्याच्या निमित्ताने देतो, असे आमदार सतेज पाटील यांनी सगितले.

हेही वाचा : लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा

तर गाठ माझ्याशी

लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन चेतन नरके यांनी काय मिळवले, अशी चर्चा माझे काही हितचिंतक करत आहेत. पण, अडीच वर्षात मी जे काही मिळवले, ते आज माझ्या समोर आहे. माझी चिंता करण्यापेक्षा आपला गट सांभाळा, माझ्या आडवा पाय माराल तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. मलाही मग ‘कु्ंभी’सह इतर संस्थेत लक्ष घालावे लागेल, असा इशाराही डॉ, चेतन नरके यांनी दिला.