कोल्हापूर : शरद पवार यांच्याशी मी ४० वर्षे प्रामाणिक राहिलो. त्यांना गुरुदक्षिणाही दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर काही दिले असतानाही गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली असताना यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला, अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी समरजित घाटगे यांच्यावर टीकास्त्र डागले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल, गडहिंग्लज , उत्तर भागातील इचलकरंजी येथे रहिवास करणाऱ्या नागरिकांचा मेळावा इचलकरंजी येथील तोष्णीवल गार्डनमध्ये आयोजित केला होता.
हेही वाचा : प्रकाश आवाडे – सुरेश हाळवणकर यांचे मनोमिलन की शीतयुद्ध?
यावेळी मुश्रीफ म्हणाले, शरद पवार हे समाजवादी काँग्रेस पक्षात असल्यापासून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक राहिलो. काही दृष्ट प्रवृत्तींच्यामुळे जे संकट आमच्यावर ओढवले. तेव्हा पवार व सुप्रियाताईंशी विचारविमर्श करून हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आताचे विरोधक गेल्या पाच वर्षांपासून राजकीय पटलावर आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बदल्या करून फायदा करून घेतला. गेल्या निवडणुकीत गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली असताना अपक्ष उभे राहून त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला. याही वेळेला मोठा फायदा करून घेतला. राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव फक्त फडणवीस यांच्यामुळेच आहे. आताही गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली असताना त्यांनी पुन्हा पाठीत खंजीर खुपसला आहे. कागल मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली असल्याने लाखावर मतांनी विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजप अध्यक्ष अमृत भोसले, शामराव कुलकर्णी, पुंडलिक जाधव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे, अमित गाताडे, आदींची भाषणे झाली.