कोल्हापूर : जमीन खरेदी व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीतून दोनवडे (ता. करवीर) येथे एका हॉटेल मालकाचा दोघांनी पिस्तूलमधून गोळी झाडून काल रात्री खून केला. चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५५, रा दोनवडे) असे खून झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी सचिन गजानन जाधव, दत्तात्रय कृष्णात पाटील (दोघे रा. खुपिरे, ता. करवीर) अशी त्यांची नावे असून ते पोलिसांसमोर दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आबाजी पाटील यांचे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे फाटा येथे लॉजिंग हॉटेल आहे. तसेच ते प्लॉट, बांधकाम देवाणघेवाण व्यवसाय करत होते. दोनवडे व खुपिरे ही वेशिवरची गावे आहेत. मयत चंद्रकांत पाटील, संशयित सचिन जाधव, दत्तात्रय पाटील यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण व्यवहार होता. चंद्रकांत पाटील हे जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करण्यात माहितगार होते. त्यांच्याकडे या दोघांनी जमीन खरेदीसाठी काही रक्कम दिली होती. ती परत न मिळाल्याने वाद होता. तर पाटील यांनी या दोघांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम दिली होती. पण शेअर बाजाराने साथ न दिल्याने ही रक्कम परत करता आली नव्हती. याही कारणातून वाद होता. त्यातून नेहमी भांडणे होत असत. त्यातून त्यांच्यात बैठकही झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
हेही वाचा : कोल्हापूर : मशिद संचालक मंडळाच्या वादातून तलवार हल्ला; एकजण गंभीर जखमी
आज दोनवडे फाटा येथे चंद्रकांत पाटील यांच्या गोल्डन हॉटेलवर या तिघांची बैठक झाली. साडेआठच्या सुमारास संशयित आरोपी सचिन जाधव व दत्तात्रय पाटील यांनी पिस्तुलातून चंद्रकांत पाटील यांच्यावर हॉटेलमध्ये गोळीबार केला. एक गोळी चंद्रकांत पाटील यांच्या पोटामध्ये लागली. यावेळी ते जमिनीवर कोसळले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यावेळी चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश पाटील घटनास्थळी होता. झालेला गोळीबार आणि वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून रितेश याची बोबडी बसली. यावेळी संशयित आरोपी दोघे गाडी काढून पसार झाले.
यावेळी रितेश पाटील यांनी समोरच असणाऱ्या हॉटेलमधील तरुणांच्या सहकार्याने गाडी बोलावून घेतली. चंद्रकांत पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील तपासासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
संशयित आरोपी सचिन जाधव हा शेअर मार्केट ट्रेडिंग करत होता. यामध्ये तो आर्थिक अडचणीत आला होता. त्यामुळे ऊस तोडणी करण्यासाठी जात होता. तसेच दुसरा दत्तात्रय पाटील हा एका ऊस तोड ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. दोघे सामान्य कुटुंबातील आहेत. मात्र, त्यांच्याकडे ही पिस्तूल कुठून आली याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. दोनवडे व खुपिरे दोन्ही गावे वेशीवर आहेत. तरुणाचा खून झाल्यानंतर दोन्ही गावातील तरुणांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी करवीर पोलिसांनी खुपिरे येथे बंदोबस्त ठेवला होता.