कोल्हापूर : श्री राम मंदिर येथे अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा उत्सव सोहळ्यानिमित्त रविवारी इचलकरंजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. वाड्याच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्ग राममय झाला होता. सोमवारी अयोध्या येथे भव्य दिव्य स्वरूपात श्री राम मंदिरात राम ललाची प्रतिष्ठापना हा ऐतिहासिक समारंभ होत आहे. या ऐतिहासिक समारंभाच्या पूर्वसंध्येला इचलकरंजी येथील काळा मारुती मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंदिराचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे हे पारंपरिक वाद्य वाजवीत सहभागी झाले होते. मुख्य पेठेतून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. जागोजागी “सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम” चा जयघोष होत होता.
हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग प्रकाराने गांधीनगरात तणाव; सिंधी समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
राममय वातावरण
प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेली टुमदार पालखी, हलगी व ढोल ताशांचा गजर, शंखांचे वादन अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय, भगव्या वातावरणात गावभागातील राम मंदिरापर्यंत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
ठिकठिकाणी भव्य स्वागत
हजारो भाविक महिला शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेचे मुख्य पेठेतील दुकानदारांकडून ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. नागरिकांनी श्री रामाचा गजर करत शोभा यात्रेचा आनंद घेतला.