कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर भगवे ध्वज काढले जात आहेत. याला इचलकरंजीतील हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी विरोध दर्शवित प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. त्यावर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धर्माचा ध्वज लावता येणार नाही असे स्पष्ट करीत खाजगी ठिकाणी ध्वज लावण्यास पूर्वीप्रमाणे उभा असल्याने त्यामध्ये व्यत्यय आणला जाऊ नये असे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता सुरू झाली आहे. त्याचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने काही ठिकाणी भगवे ध्वज काढण्याचा प्रयत्न केला. त्यास संबंधीत स्थानिक ठिकाणच्या लोकांनी विरोध केला.
हेही वाचा : कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील युवराजांनंतर शाहू महाराज निवडणूक आखाड्यात
ही बाब लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी प्रांताधिकारी चौगुले यांची भेट घेतली. भगवा ध्वज हा हिंदू धर्माच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्याचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. तरीही निवडणूक आयोगाचा चुकीचा दाखला देत शासकीय कर्मचारी खाजगी जागेवरील घरे व सार्वजनिक ठिकाणचे भगवेध्वज उतरवत आहेत. या ध्वजावर कोणत्याही राजकीय पक्षाची चिन्ह नाही. त्यामुळे ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रांताधिकारी चौगुले यांनी वरील प्रमाणे आश्वस्त केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष सुजित कुंभार, अमृत भोसले, रितेश खोत, सनदकुमार दायमा, अमित पाटील, उमाकांत दाभोळे, सुजित कांबळे, राजू भाकरे, रामसागर पोटे, बाळासाहेब ओझा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.