कोल्हापूर : गळतीने पिच्छा पुरवलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाची पाहणी मंगळवारी तज्ज्ञांच्या समितीने केली. हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, असा निर्वाळा देतानाच या समितीने सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळती दुरुस्तीचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून काळम्मावाडीकडे पाहिले जाते. धरणाला मोठी गळती लागली असून, त्या विरोधात आवाज उठवूनही या कामाला गती येत नसल्याने नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या समितीने आज पाहणी करून हे काम जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे नमूद केले.

हेही वाचा : कोल्हापुरातील दुसरा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

पाणीपातळीनुसार काम

धरणातील पाणी नैसर्गिकरीत्या खाली जाईल तितक्या उपलब्ध जागेवर हे काम होणार आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामामुळे हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल, असे अपेक्षित असल्याचे मत गळतीप्रतिबंधक उपाययोजना समितीचे अध्यक्ष टी. एन मुंडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय; कोल्हापुरात निषेधार्थ आंदोलन

गळती, निधी किती?

धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण नऊ मोनोलिथ असून, त्यांपैकी ४, ५ व ७ मध्ये गळतीचे प्रमाण अधिक आहे. धरण २५.४० टीएमसी पूर्ण क्षमतेने भरल्यास पूर्ण संचय जलसाठा होतो. धरणाच्या स्थिरता व सुरक्षिततेसाठी या वर्षी पावसाळ्यात २२ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. तरीही धरणाच्या भिंतीतून प्रतिसेकंद सुमारे ३७० लिटर गळती होत राहिली. आज धरणामध्ये १९.८१ टीएमसी पाणीसाठा असताना गळती कायम असून, ती रोखण्यासाठी ८०.७३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Story img Loader