कोल्हापूर : करवीर मतदारसंघातून राहुल पाटील निवडणूक लढणार आहेत. यानिमित्ताने दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा विधानसभेचा वारसदार रविवारी मेळाव्यात निश्चित झाला. आमदार पी. एन. पाटील यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा राजेश व राहुल या मुलांनी चालवावा. तसेच राहुल पाटील यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय यावेळीघेण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाकरे फाटा (ता. करवीर ) येथील विठाई – चंद्राई लॉन मध्ये स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आणि समर्थकांचा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बी.एच. पाटील होते. प्रारंभी स्व. आम.पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करून आदरांजली वाहण्यात आली. ‘ अमर रहे अमर रहे आमदार पी.एन.पाटील अमर रहे’ घोषणा देण्यात आल्या. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यातील हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरले होते.

हेही वाचा : कोल्हापूर : पंचगंगा नदीला प्रदूषित दुधाळ रासायनिक सांडपाण्याचा विळखा

निष्ठेची शपथ

आमदार पी.एन.पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून जनसेवेसाठी वाहून घेतले. प्रसंगी नुकसान सोसले पण गांधी घराणे, काँग्रेसवरची निष्ठा आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम कधी ढळू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागे राहणारा आधारवड सर्वांनी हरवला आहे. त्यामुळे त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबाच्या मागे राहण्याची जबाबदारी आपली असल्याचा निर्धार हात उंचावून सर्वांनी केली. विधानसभेला मोठा विजय हाशील करण्यासाठी राजेश – राहुल पाटील यांच्या पाठीशी निष्ठेने राहण्याची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली.

गोकुळचे संचालक विश्वास पाटील म्हणाले, आमदार पी.एन.पाटील यांचे विचार जपण्यासाठी त्यांचे पुत्र राजेश – राहुल या रामलक्ष्मणाच्या जोडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत विश्वास त्यांना देऊया आणि एकनिष्ठतेची शपथ पूर्ण करण्यासाठी धैर्याने विधानसभेच्या कामाला लागूया.

हेही वाचा : कागल तालुक्यात प्रचार कोणी केला मंडलिक गटाला पक्के माहीत – हसन मुश्रीफ

ज्येष्ठांचे पाठबळ

गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे यांनी आम. पाटील यांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व कार्यकर्ते राजेश व राहुल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा राधानगरी तालुक्याच्या वतीने ग्वाही दिली.मेळाव्याचे अध्यक्ष बी.एच.पाटील म्हणाले, आम.पी.एन. पाटील यांचे कुटुंब जो निर्णय घेतील ते नेतृत्व मानुया. कार्यकर्त्यांची दिशा स्पष्ट व्हावी म्हणून हा मेळावा होता. सर्वांनी हातात हात घालून पांडुरंगाची ही दिंडी पुढे नेऊया.

पीएन ब्रँड टिकवणार

प्राचार्य आर. के.शानेदिवाण म्हणाले, आम.पी.एन पाटील हाच एक ब्रँड आहे आणि तो यापुढेही टिकवून ठेवूया. साहेबांची जबाबदारी आता कार्यकर्त्यांनी घेतलीच आहे. त्यामुळे सर्वांना स्वतःच वेळ काढावा लागणार आहे. राजेश – राहुल यांना योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी कुणाशी वितुष्ट न घेता सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊया. भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी हातात हात घालून एकदिलाने काम केले तर अवघड काहीच नाही. राजेश व राहूल पाटील हीच आमची ताकद आहे, त्यांना बळ देऊया.

मार्गदर्शन घेणार

गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी आम. पी.एन. पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ नेत्याचे विचार जपण्यासाठी गगनबावडा तालुका पाटील कुटुंबाच्या पाठीशी आम. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले तर जयसिंग हिर्डेकर, शाहू काटकर, भरत मोरे यांनी पन्हाळा तालुका ताकदीने सोबत असणार हा मनोदय व्यक्त केला.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ओढ्यांना पूर

यावेळी गोकुळ संचालक बाबासो चौगले, बाजार समिती सभापती भारत पाटील, उदयानीदेवी साळुंखे, बी.के.डोंगळे, पांडुरंग पाटील, एम.आर.पाटील कुरुकलीकर, प्रकाश मुगडे, आप्पासाहेब माने, केडर प्रतिनिधी दत्तात्रय पाटील, दादू कामिरे, विजय कांबळे यांचेसह प्रमुख कार्यकर्त्यांची मनोगते झाली. स्वागत व प्रास्ताविक गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांन, सूत्रसंचालन प्रा. सुनील खराडे, शपथ वाचन डॉ.लखन भोगम यांनी तर शोकसंदेश वाचन एस.व्ही.पाटील यांनी केले. आभार काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.

बोलबाला राजेश – राहुलचा

दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचा फोन सर्वसामान्य माणसासाठी कायम कार्यरत असायचा. ‘ पी.एन. पाटील बोलतोय ‘ म्हटल्यावर काम होऊन जायचे. त्यामुळे यापुढेही त्यांच्या वारसांनी यापुढे फोनवरून काम सांगताना मी ‘ राजेश – राहुल पी.एन.पाटील बोलतोय ‘ असाच उल्लेख करावा. यानिमित्ताने सर्वांना ‘ एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ची आठवण होत राहील असे एका कार्यकर्त्यांने सुचवताच सभागृहातील सर्वच कार्यकर्ते भावुक झाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur karvir assembly election candidate rajesh patil after pn patil css