कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस भवनात एकच गर्दी झाली. अश्रूभरल्या नेत्रांनी कार्यकर्ते, नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले . कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व हरपले अशा भावना श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केल्या. तर तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भावना व्यक्त केल्या. शासकीय इतमामात अंत्यविधी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आमदार पी. एन. पाटील हे चार दिवसांपूर्वी घरातील स्नानगृहात पाय घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना कोल्हापुरातील अस्टर आधार या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर मेंदू विकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारासाठी मुंबईहून नामवंत मेंदू विकार तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या निगराणी खाली उपचार सुरू होते. प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस
गेले चार दिवस या रुग्णालयात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली होती. तर गावागावांमध्ये पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देव देवतांना साकडे घालण्यात आले होते. दरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पी. एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर राजारामपुरी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात आले.
यानंतर कोल्हापूर जिल्हा काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव आणण्यात आले. येथे अंत्यदर्शन घेण्यातील विविध स्तरातील नागरिकांनी गर्दी केली होते. कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. आमदार पी. एन. पाटील अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. काँग्रेस पक्षाचा तिरंगा ध्वज लपेटलेले त्यांचे पार्थिव सुमारे तासभर येथे ठेवण्यात आले होते.
हेही वाचा : कोल्हापूरात अनधिकृत होर्डिंगधारकांना दणका; तिघांवर गुन्हा दाखल
यावेळी श्रीमंत शाहू महाराज, युवराज मालोजी राजे , आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी मंत्री जयवंतराव आवळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्.ही बी. पाटील, शहराध्यक्ष आर . के. पोवार, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह अनेकांनी अंत्यदर्शन घेतले.
काँग्रेस नेतृत्वास दुःख
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेस पक्षाशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. काँग्रेसचे एक उमदे नेतृत्व हरपल्याचे अपार दुःख कार्यकर्त्यांना आहे.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाची वाटचाल करत असताना आमदार पाटील हे नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहे. त्यांच्याकडे पाहून काँग्रेस पक्षाची वाटचाल कशी झाली पाहिजे याचे धडे कार्यकर्त्यांनी गिरवले आहेत. त्यांना प्रेरणास्त्रोत मानून काँग्रेस पुढील वाटचाल करीत राहील.
हेही वाचा : यंत्रमागाच्या वीज सवलतीची जाचक अट आणखी किती काळ?; अट रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आमदार पीएन पाटील हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी मोठा आधार होते. एक माणूस म्हणूनही त्यांचे मोठेपण कायमच स्मरणात राहणारे आहे. काँग्रेस पक्षाला त्यांनी घालून दिलेली वाट ही नेहमीच आदर्शवत राहील.
कोल्हापूर महानगर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, काँग्रेसचा कार्यकर्ता किती तत्त्वनिष्ठ, पक्षाशी एकनिष्ठ असतो याचे पी. एन. पाटील यांच्यापेक्षा दुसरे उदाहरण पाहायला मिळणार नाही. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा विचार जपला. तो वाढवला. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षासमोर पोकळी निर्माण झाली आहे.