कोल्हापूर : राज्यामध्ये भाजप, शिंदे सेनेचे नेते उघडपणे गोळीबार करत आहेत. गुंडांचा नंगा नाच चालू असताना कोणाचाही वचक राहिलेला नाही. महाराष्ट्र हे गुंड, भूमाफिया, खंडणी बहाद्दरांचे राज्य बनले आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात केली. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आज दानवे यांनी घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीच्या वेळी अभिलेखावरील तुरुंगातील गुंडांना पॅरोलवर सोडले होते. त्यांचा राजकारणासाठी वापर केला गेला. आजही महाराष्ट्रात गुंडांचेच राज्य आहे. जमिनी बळकावण्याचे, हडपण्याचे उद्योग सरकारी आशीर्वादाने सुरू आहेत. अशा राज्यात जनता असुरक्षित आहे, अशी टीका त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे, असा उल्लेख करून ते म्हणाले, ही योजना सुरू झाली तेव्हा राज्यामध्ये एक कोटी ५२ लाख खातेदार होते. आता पंधरावा हप्ता दिला तेव्हा ही संख्या ८० लाखांवर आली आहे. शेतकऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित असताना त्यात सतत कपात होत चालली आहे. याचा अर्थ ही योजना गुंडाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे सुरू केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. याविषयी बोलताना दानवे म्हणाले, एक रेल्वे सुरू केली म्हणजे देशाचे परिवर्तन घडवून येईल असे थोडेच असते. देशाची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. परदेशी धोरण अपयशी ठरले आहे. अमृतकाळाचा एक थेंबही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा : तयार मल्लांचा शोध; उमेदवारीसाठी महायुती – ‘मविआ’त शह – काटशह 

शासन आपल्या दारी अशी योजना सरकारने सुरू केली असली तरी लोकांचे एकही काम वेळेवर होत नाही. म्हणून तर मंत्रालयामध्ये लोकांच्या रोजच रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे हजारे लोकांचा मेळावा घेण्यापेक्षा शेकडो लोकांची कामे मार्गी लावावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेने जनता दरबार सुरू केले आहेत. ३७ वर्ष प्रलंबित असणारे एक काम मी मार्गे लावले. असा अनेकांना फायदा या माध्यमातून होत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना दानवे यांनी निवडणूक आयोग म्हणजे सरकारचा नोकरदार आहे, अशी टीका केली. बहुमताच्या आधारे निकाल देणे गैर आहे. या विरोधात न्यायालयात लढाई लढत राहू, असेही त्यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur lop ambadas danve said maharashtra became state of goons land mafia extortionists css
Show comments