कोल्हापूर : ‘संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. लोकशाही बळकट झाली तर हुकूमशाही प्रवृत्ती तडीपार होणार आहे. सध्या सर्वत्र अस्थिर वातावरण आहे. समता, सुधारणावादी विचारांनी काम करत सर्व समाज घटकाचा विकास साधायचा आहे. शेतकरी, नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठीचा हा संघर्ष जिंकायचा आहे. परिवर्तनाच्या या लढाईची सुरुवात कोल्हापुरातून करू. महाविकास आघाडीच्या पाठीशी जनतेने भक्कमपणे उभे राहून विजयी करावे’, असे आवाहन उमेदवार शाहू छत्रपती यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कळंबा येथे प्रचार मेळावा झाला. कळंबा येथील प्रचार मेळाव्यात बोलताना शाहू महाराज यांनी, ‘कळंबा, पाचगाववासियांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवणुकीला प्राधान्य देऊ. पाणी मुबलक आहे, पण पाणी वितरण यंत्रणा सक्षम करावी लागेल. ती कामे प्राधान्याने होतील. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देणं, पाणी पुरवठा करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे’, असेही त्यांनी नमूद केले. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘शाहू छत्रपतींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते निवडून येणार असे वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनेतचा कौल दिसत आहे. हात या चिन्हावर बटण दाबून शाहू छत्रपतींना निवडून द्या.’

हेही वाचा : मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, ‘शिवसेनेशी आणि मतदारांशी ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना पराभूत करुन धडा शिकवू. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडला. फोडाफोडीचे राजकारण, जातीधर्मात तेढ निर्माण करण्याच्या राजकारणाने भाजपाचा पराभव अटळ आहे.’ याप्रसंगी माजी सरपंच शिवाजी कांबळे यांचे भाषण झाले. सरपंच सुमन गुरव, वैशाली टिपुगडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते उमेदवार शाहू छत्रपतींचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख विराज पाटील, कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम, पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील, किरण पाटील, एकनाथ पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती

गिरगावात सैनिक दरबारमध्ये संवाद

गिरगाव येथील सैनिक दरबार येथे उमेदवार शाहू छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच उत्तम पाटील व सदस्यांनी स्वागत केले. सैनिक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, माजी सरपंच संभाजी कोंडेकर, दत्त पंथी भजनी मंडळाचे भगवान चव्हाण, धोंडीराम पाटील, पोपट सुतार, रघुनाथ साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी शाहू छत्रपतींनी उपस्थितांशी संवाद साधला. गिरगाव हे लढवय्यांचे गाव असल्याचे गौरवोद्गगार त्यांनी काढले. महादेव कुरणे यांनी आभार मानले.

Story img Loader