कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील होती. त्यामुळे त्याचा पुढील राजकारणावर परिणाम होणार नाही, असे म्हणत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीत त्यांच्यापासून बाजूला गेलेले अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना सांभाळून घेण्याचे संकेत बुधवारी येथे दिले. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागा मोठ्या फरकाने जिंकत सत्ता कायम राखली. मुंबईहून आज येथे आलेले मुश्रीफ यांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली.
ते म्हणाले, “बिद्री कारखान्याने ऊसाला सर्वाधिक दर, फायदेशीर सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मिती प्रकल्प तसेच ऊस उत्पादक योजना या के. पी. पाटील यांच्या नेटकेपणाने राबविल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे मतदानातून दिसून आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात कारखाना प्रगतीपथावर राहील याचा विश्वास वाटतो. भाजप जिल्हाध्यक्ष आमच्याकडे आले होते, तर या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली होती.” त्यांची अनामत रक्कम जप्त होईल असे मुश्रीफ प्रचारकाळात म्हणाले होते. या निवडणुकीचे राजकीय परिणाम काय होतील या प्रश्नावर मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : बिद्री कारखान्यातील विजयाने के. पी. पाटील यांची विधानसभेची पायाभरणी, चंद्रकांत पाटील यांना धक्का
ते म्हणाले, बिद्री कारखान्याची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील होती. ए. वाय. पाटील विरोधकांकडे गेले होते तसे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आमच्याकडे आले होते. त्यामुळे या निवडणुकीचा राजकीय संबंधावर परिणाम होणार नाही. या निकालाने के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी फायदा होईल.
हेही वाचा : कोल्हापुरातून ‘पार करो मोरी नैय्या’ अंतिम फेरीत
गळाभेट आणि सत्कार
दरम्यान, बिद्रीच्या नवनिर्वाचित संचालकांनी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सत्कार केला. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मुश्रीफ यांना लवून नमस्कार केला. मुश्रीफ यांनी आशीर्वाद देतानाच के. पी. पाटील यांची गळाभेट घेऊन त्यांची या यशाबद्दल पाठ थोपटली.