कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांतीनंतर गुरुवारी पावसाचे आगमन झाले. पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे. काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे आज पुनरागमन झाले. येत्या ७२ तासांत पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात २५ ते ३० टक्के भागात पेरणी झाली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली. अशा ठिकाणी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. अजूनही दमदार पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पेरणीला गती येईल.
जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. अन्य भागातही पावसाने हजेरी लावली. शहरात आज हलक्या ते माध्यम सरी बरसात राहिल्या. गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड, कागल, शिरोळ, शाहूवाडी, करवीर, हातकणंगले तालुक्यात चांगला पाऊस झाला. केर्ली येथे रस्तावर मोठे झाड पडले होते. यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. राधानगरी मध्ये मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. उन्हाळ्यासारखे तापमान अनुभवणा-या करवीरसियांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. विजांचा गडगडाट आणि पावसाने गारवा अनुभवायला मिळाला आहे. सोयाबीन, भात, भुईमूग पिकांची पेरणी झालेल्या ठिकाणी हा पाऊस उपयुक्त ठरला.