कोल्हापूर: स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत, अशी विचारणा शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. राजू शेट्टी या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ अशी भाषा करत आहेत. पण दुसरीकडे ते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मातोश्रीवर फेऱ्या मारत आहेत. या मुद्द्यावरून खासदार माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा : हातकणंगलेच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर; उमेदवारीत बदल नाही, माने यांचा विश्वास
ते म्हणाले, समोरच्या उमेदवाराला अद्याप पक्ष दिशा सापडेनाशी झाली आहे. एखाद्या नववधूला नवरा पाहिजे पण आई-वडील नको अशी अट असते. तशीच अवस्था ‘एकला चलो रे’ म्हणणाऱ्यांची झाली आहे. स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत. स्वाभिमान असेल आणि नाचणारी पत्करायचे नसेल तर कोणाची चर्चा करायचं संबंध येत नाही. नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला