कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट वाढत चालले आहे. अनेकांकडे अशी गावठी पिस्तूल असल्याचे सोशल मीडियातून दिसून आले आहे. त्यांच्यावर गुन्हे ही दाखल झाले आहेत. तर अशाच एकाला आज कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. शशीभूषण जीवनराव देसाई (वय ४८, रा. गारगोटी) असे त्याचे नाव आहे.
याबाबत तपशील असा की, चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा इथं गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या गारगोटी इथल्या इसमाला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे.शशीभूषण जीवनराव देसाई (वय ४८, रा. पुष्पनगर, गारगोटी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून विनापरवाना पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस असा ५० हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : बालिंगा पूल बंद करण्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात वादंग
शशीभूषण देसाई हा पिस्तूल विक्रीसाठी पाटणे फाटा इथं येणार असल्याची पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर, त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी हवालदार तुकाराम राजगिरे, अजय वाडेकर, आनंदा नाईक, सुनील माळी, स्वप्नील मिसाळ यांच्या पथकाला देसाई हा संशयितरित्या पाटणे फाट्यावर वावरत असल्याचं दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. एकूण ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत.