कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढ प्रस्तावाला विरोध करीत शहरालगतच्या १९ गावांमध्ये रविवारी कडकडीत बंद करण्यात आला. गावागावात हद्दवाढी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरालगच्या सहा गावांचा समावेश करून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ केली जाईल असे विधान अलीकडेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक होऊन त्यावर टीका करण्यात आली. याचवेळी रविवारी गाव बंदचे आवाहन केले होते.
हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
त्यानुसार या सर्व १९ गावांमध्ये आज सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. दुकाने, आस्थापने बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. पावसात भिजत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी एकत्र येऊन हद्दवाढविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.कोल्हापूर महापालिकेने स्वतःचा कारभार सुधारावा मग हद्दवाढीची भाषा करावी अशी टीकाही करण्यात आली हद्दवाढ झाली तर आत्मदहन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनामध्ये कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष नारायण गाडगीळ, सचिव अमर मोरे सहभागी होते.