कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडला. पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षाही दोन फूट अधिक उंचीवरून वाहत आहे. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच अनेक नगरपालिकांच्या नागरी भागामध्ये पाणी घुसत असल्याने पुराची तीव्रता वाढत आहे. जिल्हा, स्तहनिक प्रशासन पूर परिस्थिती नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहे.
जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत आज पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच होता. कोल्हापूरात पंचगंगा नदीची पाणी पातळी काल दुपारी ४ वाजता ४३ फूट ४ इंच म्हणजे ४३ फूट या धोका पातळीपेक्षा अधिक होती. ती पहाटे चार वाजता एक फुटाने वाढली होती. तर आज सायंकाळी याचवेळी ४५ फूट ५ इंच पातळी होती. दरम्यान जिल्ह्यातील ९२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हेही वाचा : “भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा
शहराच्या अनेक नागरिक भागांमध्ये पुराचे पाणी आले आहे. लक्षतीर्थ वसाहत, सुतारवाडा , विन्स रुग्णालय, रमण मळा, रेणुका मंदिर, बापट कॅम्प, कदमवाडी, तावडे हॉटेल अशा १० ठिकाणी पाणी आले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व्हीनस कॉर्नर परिसरातील दुकाने जयंती नाल्याचे पाणी पसरल्याने बंद होती. येथे गुडघाभर पाणी साचले होते. अशाच पाण्यातून धोकादायक वाहतूक सुरू होती. असेच चित्र जिल्ह्यात अन्यत्रही आहे. इचलकरंजीतील पुराचे पाणी नागरी भागात वाढत चालले आहे.
हेही वाचा : गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी कोल्हापुरात एकास अटक
कैद्यांचेही स्थलांतर
वाढत्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील ६० पुरुष व २० महिला असे ८० कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलवले आहेत.
वाहतूक कोंडी
पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या सेवा मार्गावर पाणी विस्तारत चालले आहे. तेथेही धोकादायक वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर – सांगली मार्गावर उदगाव येथे पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला.