कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये शनिवारी पावसाच्या उघडझापीचा खेळ सुरू राहिला. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे मुसळधार कोसळणे अजूनही सुरूच असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अल्पशी वाढ झाली. २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाचा इशारा कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आला आहे.
या आठवड्याभरात जिल्ह्याच्या पाणलोट भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे राधानगरी, तुळशी, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा, जांभरे, आंबेओहोळ या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी काल सायंकाळी २५ फुटावर आली होती. आजच्या याचवेळी ही पाणी पातळी २५ फूट ८ इंच होती.
अधिकाऱ्यांचा वावरातील वावर
पावसाची संततधार कायम असल्याने शेती कामाला गती आली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर या गावांमध्ये कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे व सहकार्यांनी चार सुत्री भात लागवड प्रात्यक्षिक केले. शेतकऱ्यांप्रमाणे सराईतपणे चिखलात, उभ्या पावसात शेतकरीपुत्र असलेल्या अधिकाऱ्यांनी लागवड केल्याने शेतकऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.