कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वाभिमानीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची रातोरात धरपकड चालवली आहे. अनेक पोलीस ठाण्यामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते दाटीवाटीने बसल्याचे दिसत आहे. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काही वेळात रास्ता रोको सुरू होणारच, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. मागील हंगामासाठी प्रति टन ४०० आणि यावर्षी एक रकमी साडेतीन हजार रुपये उचल मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. याबाबत जिल्हा पातळीवर तीन बैठका झाल्या होत्या. तर काल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊनही तोडगा निघाला नाही.
हेही वाचा : कोल्हापूरात उसदराची कोंडी फोडली गुऱ्हाळघराने; मागील १०० रुपये देण्यास मान्यता, कारखान्यांचा मुद्दा लटकलेलाच
त्यानंतर राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी काल रात्रीपासून स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची धरपकड सुरू केली आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी झालेली आहे.
हेही वाचा : ऊस प्रश्नावर तोडगा निघणार? बुधवारी मंत्रालयात बैठक, राजू शेट्टी यांना निमंत्रण
राजू शेट्टी थोड्याच वेळात कोल्हापूरकडे रवाना होत आहेत. कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन साखर कारखानदार व विरोधी पक्षासह सरकारला सुबुध्दी मिळो, असे अंबामातेकडे साकडे घालून पंचगंगा पुलावर चक्काजाम आंदोलन सुरू करणार आहेत, असे मध्यवर्ती कार्यालय, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सांगितले.