कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या बकालीकरणास कारणीभूत, ढिम्म, अकार्यक्षम आणि बेजबाबदार महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलनाची सुरुवात मंगळवारी लाक्षणिक उपोषणाने करण्यात आली. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे आदींसह कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर शहरात नागरी समस्यांनी सध्या अक्षरशः थैमान घातले आहे. गेली सुमारे साडेतीन वर्षे महानगरपालिकेत प्रशासकराज असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेत नसतानाही कोल्हापुरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शहराचे बकालीकरण सुरू आहे. १५ दिवसात सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास आणि शहराचे बकालीकरण न थांबल्यास नागरिकांच्या साथीने तीव्र जन आंदोलन उभे करणार असा इशारा देण्यात आला होता. पण प्रशासनाने या समस्या दूर करण्यासाठी कोणतीही पाऊले न उचलल्यामुळे अखेर आंदोलन सुरुवात करण्यात आले आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक; महायुतीच्या नेत्यांचाच ‘शक्तिपीठ’ला विरोध

नोव्हेंबर २०२० मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत संपली. तेव्हापासून गेले साडेतीन वर्षे महानगरपालिकेत सर्व कारभार आयुक्त तथा प्रशासक यांच्या अधिकारात चाललेला आहे. या साडेतीन वर्षात पाणीपुरवठा, आरोग्य, विकास कामे, नगररचना, उद्यान, इस्टेट विभाग अशा नागरिकांशी थेट संबंध असणार्‍या सर्वच खात्यांचे कामात कमालीचा ढिसाळपणा आला आहे.

गाजावाजा करून आणलेल्या थेट पाईपलाइनचे पाणी कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी येऊनही कोणत्या ना कोणत्या भागात रोज पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. वांगी बोळ, देशपांडे गल्ली, पोतनीस बोळ, मिरजकर तिकटी या कायम पाण्याची समस्या भेडसावणार्‍या शहराच्या मध्यवर्ती परिसरा सोबतच शहराच्या सर्व जुन्या पेठात आणि काही उपनगरात पाणीपुरवठ्यच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

हेही वाचा : इचलकरंजीतील दोन माजी सभापती मध्ये विकास कामावरून वादावादी; पोलीस ठाण्यात तडजोड

शहरातील कचरा उठाव आणि प्रक्रीया याचा कोणताही ताळमेळ होत नसल्याने आणि कचरा उठावामध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कामावरून कमी झालेल्या कर्मचार्‍यांच्या समस्येवर प्रशासनाने उपाययोजना न केल्यामुळे शहराच्या अनेक भागात नियमीत स्वच्छता होत नाही. गटर,छोटे चॅनेल व नाले गाळाने भरून गेले आहेत. इस्टेट आणि परवाना विभागाच्या अनागोंदीपूर्ण दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे, टपर्‍या आणि बेकायदेशीर यात्री निवासांचे पेव फुटले आहे. शहरात जवळजवळ ३०० च्या आसपास बेकायदेशीर यात्रिनिवास आहेत , असा अंदाज आहे.

हेही वाचा : रत्नागिरी हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग भूमीसंपादनास कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध ; जशास तसे उत्तर राजू शेट्टींचा इशारा

महानगरपालिकेची व्यवस्था अजगरासारखी सूस्त

शहरात अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या विकास कामांमुळे पादचारी आणि वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. या सर्व समस्यांसाठी सामान्य नागरिकांनी तक्रार केल्यावर त्यांना प्रशासनाकडून ना उत्तर मिळते ना त्या तक्रारीवर कारवाई होते. महानगरपालिकेची संपूर्ण व्यवस्था अजगरासारखी सूस्त झाली आहे. लोकसभा निवडणूक पार पडली असल्यामुळे प्रशासकांनी आता नुसतीच स्थळ पाहणी न करता गांभीर्याने प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन पंधरा दिवसात सर्व समस्यांचे समाधानकारक निराकरण करावे , असे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने यात काहीच केले नसल्यामुळे नागरिकांच्या साथीने तीव्र जनआंदोलनची सुरुवात मंगळवारी महानगरपालिका समोर लाक्षणिक उपोषण करून सुरुवात झाली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur protest against the administration of municipal corporation for serious public issues css
Show comments