कोल्हापूर : संकेश्वर-बांदा महामार्गासाठी आजरा एमआयडीसी येथे उभारलेल्या टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेला टोलमुक्ती मिळावी यासह टोल हद्दपार झाला पाहिजे, अशी मागणी टोलविरोधी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी विराट मोर्चाद्वारे आजरा तालुक्यातील नागरिकांनी केली. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीने केले. टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या आजरा बंदलाही व्यापारी असोसिएशन यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टोलविरोधी आंदोलन मोर्चाला आजरा आंबोली रोडवरील हॉटेल मिनर्व्हा येथून सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी टोलविरोधाच्या घातलेल्या टोप्या लक्षवेधी ठरल्या. आजरा तालुक्यातील जनतेला टोल माफी मिळालीच पाहिजे, टोल रद्द झाला पाहिजे यासह विविध घोषणा देत विराट मोर्चाने नागरिक टोल नाक्यावर येऊन धडकले. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोल मुक्ती आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्गामुळे प्रवास सुखकर होईल, याकरता सर्वांनी महामार्गाच्या कामाला सहकार्य केले. मात्र टोलचे बेकायदेशीर भूत आमच्या मानगुटीवर लादले गेले आहे. पण आम्हाला टोल माफी नाही टोल मुक्तीच हवी आहे. राज्यमार्गाच्या कामाला ठेकेदार मिळत नसल्याने हा रस्ता महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. पण या रस्त्याची बांधणी ही बांधा वापरा हस्तांतर करा या तत्त्वावर झालेली नसून याकरता महामार्गाने निधी लावला आहे. रस्ता चार पदरी किंवा सहा पदरी झालेला नसून फक्त रस्त्याची रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. महामार्ग चार पदरी नसताना टोल वसुलीचा घाट का घातला जात आहे? महामार्गाच्या कामाचे पैसे राज्य शासनाने केंद्र शासनाला देऊन रस्ता टोलमुक्त करावा. या रस्त्याच्या टोलबाबत दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. हा रस्ता तयार करत असताना महामार्गाचे निकष पाळले गेलेले नाहीत. त्यामुळे अपघातांची मालिका होणार आहे. या टोलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडायचा आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधत सांगितले की, टोल प्रश्न तालुक्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन टोल मुक्ती बाबत धोरण ठरवण्यात येईल. टोल मुक्तीच्या आंदोलनात आपण जनतेबरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादनास विरोध; शेतकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पर्यटकांना टोल बसवण्याच्या नादात आजरा तालुकावासियाना आर्थिक फटका बसणार आहे. संकेश्वर बांदा रस्त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना हा रस्ता महामार्ग कसा होऊ शकतो? टोलला हद्दपार करण्यासाठी जन आंदोलन, राजकीय लढाई व कायदेशीर लढाई या तिन्ही बाबींचा अवलंब करावा लागेल. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. टोल हटवल्याशिवाय आता कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग व आजऱ्याजवळचा टोल याला आमचा विरोध आहे. या कामांना स्थगिती नको तर ती रद्द झालं पाहिजे. सरकारने आमच्या मागण्यांच्या कडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात संघर्ष अटळ आहे.

हेही वाचा: राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू; राजू शेट्टी यांची घोषणा

जिल्हा बँक संचालक अॅड. शैलेश देशपांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, माजी. जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, उल्हास त्रिरत्ने यांनी मनोगत व्यक्त केली. टोलमुक्ती आंदोलनाला आजरा तालुक्यातील व्यापारी संघटना, बार असोसिएशन संघटना, डॉ. संघटना, सरपंच संघटना, आजरा साखर कारखाना कामगार, तोडणी ओढणी वाहतूकदार व इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता.