कोल्हापूर : पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच मुस्लिम समाजाने निदर्शने केली. पहेलगाम मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २७ जणांना प्राण गमवावे लागले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बिंदू चौकात आंदोलन केले . पर्यटकांची धर्म विचारून हत्या करणाऱ्या झोंबी अतिरेक्यांचा निषेध करण्यात आला.

आंदोलनात हिंदू एकताचे माजी जिल्हाध्यक्ष संजय साडविलकर, हिंदुराव शेळके, विलास मोहिते, बापू वडगावकर ,अजित तोडकर ,आनंदराव कवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू एकताच्या आंदोलनावेळी पाकिस्तानच्या झेंड्यावरून वाहने फिरवली गेली.

मुस्लिमांची निदर्शने

पहेलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दसरा चौकात भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध घोषणा देण्यात आल्या. मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर , प्रशासक कादर मलबारी, रफिक शेख , रफिक मुल्ला, सुचिता मंडलिक, वहिदा शिकलगार, सादिया मलबारी , मिसबाह पठाण, साबिया सिद्दिकी यांच्यासह विविध पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिवसेनेकडून निषेध

पहेलगाम पर्यटक हल्ला हा केंद्रीय गृह व गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे असा उल्लेख करून उद्धव ठाकरे शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा , अशी मागणी केली आहे. देशात होणाऱ्या काही निवडणुकांपूर्वी असे हल्ले का होतात. क्रूर हल्ल्यांचे राजकारण न करता पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे; जेणेकरून असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटले आहे.