कोल्हापूर : भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्‍वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवून समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे असताना अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. गुरुवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे हे आंदोलन घेण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदुत्वनिष्ठ. रामभाऊ मेथे यांनी केले. या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, श्री. अवधूत चौगुले आणि श्री. नितीन चव्हाण, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. रणजित जाधव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित पाटील, अमेय भालकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि कु. प्रतिभा तावरे उपस्थित होत्या.

हेही वाचा…कोल्हापुरात पोल्ट्रीचालकाची तीन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण; बाल हक्क आयोगाकडे तक्रार

यापूर्वीही आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटात भगवान शिवाविषयी अपमानास्पद दृष्ये आणि आक्षेपार्ह संवाद दाखवले होते. हिंदु संतांना गुंड म्हणून दाखवले होते. आता तोच प्रकार ‘महाराज’ या चित्रपटातून त्याचा मुलगा करत आहे. १५० वर्षापूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधूसंत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्याचे षड्‍यंत्र केले जात आहे. या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात, असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे जबाबदार असतील. असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

हेही वाचा…इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती; ओमप्रकाश दिवटे ‘मॅट’मध्ये जाणार?

जुनैद खान, अमिर खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे मदरश्यांमध्ये मौलवींद्वारे होणारे मुला-मुलींचे लैंगिक शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का?, लहान मुलांची माथी भडकवून त्यांना जिहादी कृत्यांसाठी प्रोत्साहित केले जाते, त्यांच्याकडून आतंकवादी आणि देशविघातक कृत्ये कशी करवून घेतली जातात, या विषयावर चित्रपट बनवतील का? चर्च वा चर्चप्रणीत वसतिगृहामध्ये ख्रिस्ती धर्मगुरुंकडून होणारे मुले आणि महिलांचे शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का? अशा विषयांवर चित्रपट काढण्याचे धाडस बॉलीवूड करणार नाही; मात्र हिंदू संतांना, हिंदू धार्मिक कृत्यांना सहजतेने लक्ष्य केले जाते. हिंदू सहिष्णु असल्याने आणि ‘सेक्युलरिझम’ च्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवले जाते. हे कदापि सहन केले जाणार नाही. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये. सरकारने या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी. तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायदा’ देशभरात लागू करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur protestors demand ban on aamir khan s son junaid khan s film maharaj for defaming hindu saints psg