कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढून लोकसभा निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकू; असा विश्वास शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी कोणाला मिळणार याचा गुंता वाढला होता. याच दरम्यान, शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
चळवळ महत्वाची
शिवसेनेने मशाल चिन्ह घेऊन राहणाऱ्यास उमेदवारी देण्याची अट घातली होती. शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभे राहायचे राहिले तर गेली २५ वर्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ थांबवावी लागणार होती. त्यास शेट्टी यांची तयारी नव्हती. निवडणुका येतात – जातात. त्याहीपेक्षा चळवळ ही अधिक महत्त्वाची आहे, असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी केले. उमेदवारीसाठी चळवळीचा त्याग करणार नाही, यावर ते ठाम आहेत.
हेही वाचा : खासदार मंडलिक, माने – विनय कोरे भेटीत निवडणुक रणनीतीची चर्चा
स्वबळावर जिंकणार
आज उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावर शेट्टी पुढे म्हणाले, शिवसेनेने कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजप विरोधातील मताची विभागणी होऊ नये यासाठी माझे ठाकरे यांच्याकडे प्रयत्न सुरू होते. आता त्यांनी उमेदवार दिला असला तरी आम्हाला आमची लढाई लढावी लागणार आहे. स्वबळावर निवडणूक लढवून या निवडणुकीत निश्चितपणे विजय मिळवू, असा विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी कसून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले