कोल्हापूर : मागील हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन दुसरा हप्ता ४०० रूपये व यावर्षी पहिली उचल ३५०० रूपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या रविवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले की, १३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ऊस परिषद झाल्यानंतर १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका होऊनही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचा : “राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांनी रोखावे”, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

शेट्टी हातकणंगलेत

कोल्हापूर जिल्ह्यात १५ ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. मी स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांसह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे. राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत. कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत ऊस तोड आम्ही सुरू करू देणार नाही. यानंतर आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur raju shetty will intensify the agitation on sugarcane price css
Show comments