कोल्हापूर : साखरपुडा आणि लग्न या शब्दावरून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात जुंपली. गंमतीत सुरु झालेला शब्दांचा प्रवास काटेरी वळणावर आला. यातून महाविकआघाडी आणि स्वाभिमानी मधील दुरावलेले अंतर नजरेत भरले.
राजू शेट्टी आमच्या बरोबर यावेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती. ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला होती. ती काँग्रेसकडे असती तर आम्ही सर्वांना विचारून त्वरित निर्णय घेतला असता. स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला; मात्र लग्न जमलं नाही, असा मिश्किल टोला आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
हेही वाचा : मविआ – महायुतीच्या साखर कारखानदारांचे माझ्या विरोधात कारस्थान; राजू शेट्टी यांचा आरोप
या प्रतिक्रियेला राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुळात तुमच्याकडे एवढी ताकत होती क्षमता होती तर मला मशाल चिन्ह घ्या म्हणून का म्हणत होता या प्रश्नाचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. यामुळे साखरपुडा करायचा प्रश्नच येत नाही.