कोल्हापूर : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त सोमवारी अवघा कोल्हापूर जिल्हा राममय झाला होता. दिवसभर प्रभू रामचंद्रांशी निगडित विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. येथील छत्रपती चॅरिटेबल देवस्थानच्यावतीने करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात छत्रपती शाहू महाराज, महाराणी याज्ञसेनीदेवी, माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती यांनी आरती, पूजा विधी केला. यावेळी शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय छत्रपती घराण्यात आजपर्यंत चार छत्रपतींना राजाराम हे नाव देण्यात आले आहे. यावरूनच या घराण्याची रामभक्ती दिसून येते असेही ते म्हणाले.
हेही वाचा : कोल्हापूर : राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त इचलकरंजीत भव्य शोभायात्रा
कागल मध्ये उत्साह
कागल येथील श्रीराम मंदिर येथे सकाळपासूनच राम भक्तांनी प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी रीघ लावली होती. दिवसभर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा रामनाम जप करण्यात आला. आकर्षक विद्युत रोषाणाईमुळे संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते. शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे, श्रेयादेवी घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे, प्रवचनकार कांचनताई धनाले आदींनी महाआरती केली. नेपाळमधील एक दाम्पत्य या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यातील परप्रांतीय नागरिकांनीही दर्शन घेतले.