कोल्हापूर : गद्दारांना धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना मोठे करण्याची भूमिका लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने घेतली. आता शिवसेनेने व्यवहारी भूमिका घेत राजकारण केले पाहिजे. बाहेरील कोणाला उमेदवार देण्यापेक्षा शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली पाहिजे, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी केले. व्हनाळी ता.कागल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कागल-राधानगरी चंदगड विधानसभा मतरादर संघातील पदाधिका-यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण दुधवाडकर होते. मेळाव्यास माजी आमदार संजयबाबा घाटगे,शिवसेना उपनेते संजय पवार,विजय देवणे, दिनकर जाधव,गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे ,उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे,जयसिंग टिकले उपस्थित होते.
आमदार जाधव पुढे म्हणाले, होवू दे चर्चा यातून चांगला फायदा शिवसेनेला झाला. हे लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालातून दिसले.उद्धव साहेब ज्या पक्षासोबत आहेत त्याठिकाणी जास्त जागा निवडून येतात.गद्दारी करणा-या भाजपला छोट करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ झाले पाहिजे.जो कोणी शिवसेनेशी गद्दारी करेल,विश्वासघात करेल त्याला धडा शिकवायची भुमिका आपण ठेवली पाहिजे. येत्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडणून आणूया. उध्दव ठाकरे आजारी असताना त्याचा फायदा घेत भाजपने त्यांच्या पाठीत वार केला.त्यांना महाराष्ट्राच्या गादीवरून तडीपार करूया. त्यांची घमेंड या विधानसभा निवडणूकीत उतरवा. देशाच्या संविधानावरील संकट संपलेले नाही,भाजपला संविधान बदलायचे आहे.त्यांच्या मनात अजून हा डाव शिल्लक आहे. राज्या –राज्यातील सत्ता जर त्यांच्या हातात दिल्या तर विधीमंडळात ठराव करून ते संविधानात बदल करू शकतात. भाजप आम्हाला हिंदूत्व सोडले म्हणत असेल तर विधानपरिषदेच्या निवडणूकीत एमआयएमची ची दोन मतं कोणाला पडली..याचे उत्तर भाजपने द्यावे. म्हणजे तुम्हीच खरे जातीयवादी आहात असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. गटबाजी संघर्ष आपआपसात करत बसू नका संघर्ष विरोधकांशी करा आपल्यात नको असा सल्लाही त्यांनी शिवसैनिक पदाधिका-यांना दिला. भाजपाने शिवसेनेशी गद्दारी केली. भविष्यात सर्व पक्षांशी युती करा पण भाजपाशी नको असेही ते म्हणाले.
हेही वाचा : कोल्हापूर महापालिका हद्दवाढीस विरोध ; १९ गावांत कडकडीत बंद
संजयबाबा घाटगे म्हणाले, भास्कर जाधव हे धडाडीचे नेते आहेत. आदरणीय उद्धव साहेब यांनी दिलेली जबाबदारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतात. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक किती निष्ठावंत आहेत हे लोकसभेच्या निवडणूकीतून त्यांनी दाखवून दिले आहे. स्वागत जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे यांनी केले . कार्यक्रमास शिवसिंह घाटगे, सुरेश चौगले,संभाजी पाटील,नानासो कांबळे,के.के.पाटील, नागेश आसबे,मारूती पुरीबुवा,अशोक पाटील, बाजीराव पाटील ,दिलीप कडवे, धोंडिराम एकशिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.सुभाष पाटील यांनी केले आभार संभाजी भोकरे यांनी मानले.
हेही वाचा : पावसामुळे कोल्हापूरकरांचा सलग दुसरा रविवार घरात बसून; जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता
लाडकी बहिण… खोटारडा भाऊ
भास्कर जाधव म्हणाले, भाजपाने गॅस,पेट्रोल,डिझेल,खते दैनंदिन जीवनावशयक वस्तूंची महागाई वाढवून जनतेची लूट करून त्यांचेच पैसे विविध करातून गोळाकरून महिना १५००रूपये देणारी ही होजना म्हणजे लाडकी बहिण नाही तर खोटारडा भाऊच आहे हे महिलांना देखील चांगलेच माहिती आहे.