कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही, असे नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ती लवकरच येईल, असा निर्वाळा दिला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी असे विधान करत एक प्रकारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आपण उमेदवार असणार, असे स्पष्ट केले आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा झाला. तेव्हा त्यांनी सर्वप्रथम श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबतची चर्चा केली होती. तथापि, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी शाहू महाराज हे निवडणुकीबाबत चर्चेत आहेत. हे मला प्रथमच कळत आहे, असे सांगितले. पण याचवेळी त्यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील तर आम्हाला आनंदच होईल, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते.
हेही वाचा : कोल्हापुरातील उमेदवार निवडीची अनिश्चितता कायम
त्यानंतर गेले दोन दिवस कोल्हापुरात शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू होती. याबाबत आज श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहात, अशी चर्चा होत आहे. याबाबत काय मत आहे ? अशी विचारणा केली. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी यामुळे अनेकांना आनंदच होईल. यात काही प्रश्नच नाही, असे स्पष्ट केले.
हेही वाचा : इचलकरंजीत सुळकुड पाणी योजनेचे उपोषण सायंकाळी मागे
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामध्ये काही अडचण येईल असे वाटत नाही. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवण्याबाबत अद्याप तरी ऑफर आलेली नाही. पण ती येण्याची शक्यता आहे , असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरातील सामान्य जनता तुम्ही लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडत आहे, असा प्रश्न विचारला असता शाहू महाराज म्हणाले, तसे असेल तर आपण सर्वजण मिळून वाटचाल करूया. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी चिन्ह मिळाले असल्याकडे लक्ष वेधले असता शाहू महाराज म्हणाले, तुतारी ही नेहमीच चांगल्या कार्यामध्ये वाजवली जाते. ती वाजत राहील, असे उत्तर दिले.