कोल्हापूर : गुप्तधन मिळवण्यासाठी लालसेने अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार कौलव (ता. राधानगरी) येथे उघडकीस आला. याप्रकरणी सहा जणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

कौलव येथील शरद धर्मा कांबळे या तरुणाने गुप्तधनासाठी घरी अघोरी प्रकार सुरू केल्याची चर्चा होती. ही माहिती समजल्यावर सरपंच रामचंद्र कुंभार, ग्रामस्थांनी घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा देव्हाऱ्यासमोर चार फूट खड्डा काढून त्यात चटईवर केळीच्या पानावर हळद, कुंकू, सुपारी, नारळ, पान, टाचणी टोचलेले लिंबू असे साहित्य घेऊन पूजा सुरू असल्याचे दिसले.

हेही वाचा : ‘बिद्री’च्या सभासदांचा भर पावसात मोर्चा;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी

संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा मंत्र उच्चार करत होता. त्याला विचारणा केली असता गुप्तधन मिळवण्यासाठी पूजा करत असल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी शरद धर्मा कांबळे, महेश सदाशिव माने, आशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ, संतोष निवृत्ती लोहार, कृष्णात बापू पाटील या संशयित आरोपींना अटक केली आहे.