कोल्हापूर : जावयाकडून मुलीला वारंवार होणाऱ्या त्रासामुळे चिडलेल्या सासरा आणि सावत्र सासूने ट्रॅक पँटच्या नाडीने एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केला. गडहिंग्लज ते कोल्हापूर मार्गावर कागलजवळ जावयाचा खून केला. मृतदेह कोल्हापुर मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर ठेवून निघून गेले. शाहूपुरी पोलिसांनी चार तासांत सासू आणि सास-यास ताब्यात घेऊन अटक केली.

संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत नाव आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (४८) आणि गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनगीनाळ, ता. गडहिंग्लज) या दोघांना अटक केली आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील एस.टी. प्रोव्हिजन स्टोअर्सच्या पायरीवर एका तरुणाचा मृतदेह आढळला. दोरीने गळा आवळल्याचे व्रण दिसताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला.

हेही वाचा : कोल्हापूर : राधानगरी जंगलात निळ्याशार कारवीचा बहर, अवघे डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात बुडाले

मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या डायरीनुसार त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला. मोबाइलवर कॉल केल्यानंतर पत्नी गडहिंग्लज तालुक्यातील हुनगीनाळ येथे असल्याचे समजले. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एस. टी. प्रोव्हिजन स्टोअर्ससमोर मृतदेह ठेवणा-या एका बाईचे आणि माणसाचे फुटेज मिळाले. शाहूपुरी पोलिसांनी हे फुटेज गडहिंग्लज पोलिसांना पाठवून पडताळणी करण्यासाठी सांगितले असता, ते संशयित मृताचे सासू, सासरे असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : कोल्हापुरातील तिन्ही अपक्ष आमदारांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली

पोलिसांनी आरोपींना गडहिंग्लज येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, संदीप शिरगावे हा ट्रकचालक होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी करुणा मुलाला घेऊन माहेरी गेली होती. चार दिवसांपूर्वी तो हुनगीनाळ येथे पत्नीकडे गेला. तिथेही तो त्रास देत असल्याने पत्नीने तिच्या वडिलांकडे तक्रार केली. एक तर याचा बंदोबस्त करा, नाहीतर मी आत्महत्या करते, असा निर्वाणीचा इशारा तिने दिल्याने तिच्या सावत्र आई, वडिलांनी जावयाचा खून केला. दोघांनी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.