कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी बहुतांशी एसटी बसेस वापरात आणल्या गेल्या आहेत. सुमारे ७० टक्के बसेस या कामात असल्याने सोमवारी सकाळपासून एसटी प्रवाशांना फटका बसला आहे. ग्रामीण भागातील एसटी व्यवस्था जवळपास बंद आहे. तर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरी सुरू असल्या तरी त्याचेही प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे नियमित एसटी प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर, इलेक्शन ड्युटी अत्यावश्यक असल्याने प्रवाशांना काही काळ संयम राखावा लागेल, असे एसटीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. मतदानाची प्रक्रिया शासकीय पातळीवर राबवली जात आहे. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार विविध विभागातील यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळातील बसेस या निवडणूक साहित्य केंद्रावर पोहोचवण्यासाठी सोमवारी सकाळपासून बोलवून घेतल्या आहेत. मतदान केंद्रावरून साहित्य आणण्यासाठी त्यांना उद्या दुपारनंतर पुन्हा पाचारण केले जाणार आहे.

हेही वाचा : कोल्हापूर, हातकणंगलेत शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता; अखेरच्या दिवशीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या जोडण्या सुरूच

दरम्यान या एसटी बसेस इलेक्शन ड्युटी साठी वापरल्या गेल्या आहेत. त्याचा फटका नियमित बस सेवेवर झाला आहे. प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करण्याशिवाय मार्ग राहिलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक कामाकरिता साध्या बसेस वापरात आणल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात ५८३ साध्या बसेस आहेत. त्यापैकी ४३५ बसेस निवडणूक कामासाठी वापरण्यात आल्या आहेत. एकूण ७४१ बसेस कोल्हापूर विभागाकडे सेवेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बसेस निवडणूक कामासाठी वापरल्याने त्याचा साहजिकच प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

कोल्हापूरहून इचलकरंजी, जयसिंगपूर , वडगाव, गडहिंग्लज , गारगोटी, मलकापूर , कागल, पन्हाळा, चंदगड आदि महत्त्वाच्या मार्गांवर एसटी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बहुतेक सेवा बंद करण्यात आली आहे. इलेक्शन ड्युटीसाठी बसेस जाणार आहेत याची कल्पना प्रवाशांना नाही. सध्या लग्नसराई आणि मे महिन्याची सुट्टी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. असे शेकडो प्रवासी बस स्थानकात बस कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत. एकीकडे उन्हाचा मारा आणि दुसरीकडे बसेस येत नसल्याने होणारा कोंडमारा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तासनतास थांबूनही बसेस येत नसल्याने आणि निवडणूक प्रक्रियेसाठी बसेस गेल्याचे माहीत नसल्याने त्यांच्यामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची टाकी स्वच्छ करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तिघेजण जखमी

प्रवासी सातत्याने चौकशी केंद्र, एसटी चौकशी केंद्रात जाऊन अमुक ठिकाणी जाणारे बसेस कधी येणार अशी विचारणा करून भंडावून सोडत आहेत. तर तीच ती उत्तरे देऊन अधिकारीही थकले आहेत. दरम्यान निवडणूक काम हे अत्यावश्यक सेवा असल्याने त्याकरिता मागणीप्रमाणे एसटी बसेस पुरवणे अत्यावश्यक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रात नेण्यासाठी बसेस रवाना झाल्या आहेत. त्या दुपारी एक नंतर पुन्हा सेवेमध्ये येतील. तर उद्या मंगळवारी दुपारी तीन वाजल्यानंतर याच बसेस पुन्हा मतदान केंद्रातील साहित्य आणण्यासाठी जाणार आहेत. त्या रात्री उशिरा पुन्हा सेवेमध्ये दाखल होतील, असे कोल्हापूर विभागाचे वाहतूक एसटी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur st bus passengers suffering due to putting st buses on election duty css