कोल्हापूर : पट्टणकोडोलीप्रमाणेच कोल्हापूर शहरात रातोरात दोन पुतळे उभारण्यात आले. विनापरवाना उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पुतळे हटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. स्थानिकांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. अखेर हे पुतळे झाकून ठेवण्यात आले. राजेंद्र नगर चौकात अज्ञातांनी पहाटे दोन चबुतरे बांधले. त्यावर सकाळी डॉ. आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विनापरवाना पुतळे काढून घेण्याची विनंती केली.

पुतळे हटवले जाणार नाहीत अशी ठाम भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली. पोलिसांच्या कारवाईला विरोध करीत तरुण, महिलांनी चौकातच ठाण मांडले. यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संजीव झाडे, श्रीराम कनेरकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेतृत्व सरनोबत यांनी स्थानिकांशी चर्चा केली. पुतळे झाकून ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तणाव निवळला.

मुश्रीफ यांचे आयुक्तांना आदेश

दरम्यान, या घटनेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पुतळ्यांची उभारणी करताना आवश्यक ती परवानगी घेणे गरजेचे आहे. पुतळ्यांचे संरक्षण होणेही महत्त्वाचे आहे. विटंबना होऊ नये याबाबत दक्षता घेतली गेली पाहिजे. पट्टणकोडोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अचानक पुतळा उभारण्यात आला. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा झाकून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील पुतळेही झाकून ठेवण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केलेली आहे.