कोल्हापूर : येत्या दोन दिवसांत शासन व साखर कारखानदार यांनी दराचा तिढा न सोडवल्यास तिसऱ्या दिवसापासून स्वखर्चाने शेतातील ऊस कारखान्याला पाठवून देणार आहे. यावेळी जे आडवे येतील त्यांना आडवे करून शेतकऱ्याचा ऊस वाळू देणार नाही, असा इशारा शिरोळ, हातकणंगले तालुका ऊस उत्पादक शेतकरी समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी मंगळवारी दिला.
शिरोळ येथे आज ऊसप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला. त्यांनी कारखान्यांना ऊस गाळपासाठी देण्याचा निर्धार व्यक्त केला. शिरोळ तहसील कार्यालयासमोरच मंडप घालून त्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. मोर्चात ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, शेतमजूर सहभागी झाले होते.
हेही वाचा : महाराष्ट्र क्रांती सेना हातकणंगले, जळगाव,रायगड लोकसभा मतदारसंघात लढणार; संस्थापक सुरेश पाटील यांची घोषणा
शेट्टींना आव्हान
स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या आडून लोकसभेचे घाणेरडे राजकारण करत आहे. आगामी काळात त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा ठरवाल त्या ठिकाणी मी येण्यास तयार आहे. त्यावेळी दोन हात झाले तरी चालतील, असा इशारा डांगे यांनी शेट्टी यांना उद्देशून दिला.
हेही वाचा : हसन मुश्रीफ,सतेज पाटील हे ऊस आंदोलन चिघळवणारे खरे सूत्रधार- राजू शेट्टी यांची टीका
शासनाने तोडगा काढावा
शेतकरी कृती समितीचे शिवाजीराव माने – देशमुख यांनी शासनाने दखल घेऊन तोडगा काढावा. गाळप हंगाम तातडीने सुरू करावा, अशी मागणी केली. दादासो सांगावे, सुकुमार किनिंगे, विजय कुंभोजे, पोपट परीट , बाळासो वनकोरे , संपतराव चव्हाण , सुरेश सासणे ,सुरेश पाटील , थंबा कांबळे , दिलीप माणगावे , रामचंद्र गावडे , केंदबा कांबळे , शंकर पाटील यांची भाषणे झाली.